.jpg)
राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शिरपेचात मानाचा तुरा !
- By - Team Bantosh
- Sep 18,2025
राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शिरपेचात मानाचा तुरा !
राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीला राज्यस्तरीय वसंतदादा पाटील स्मृती पुरस्कार प्रदान.
Bantosh App : बंतोष न्यूज : दि. 18 सप्टेंबर 2025 : महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादीत, पुणे यांच्या ५६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत राज्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बाजार समित्यांना वसंतदादा पाटील स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील उपक्रमशील व डिजिटल बाजार समिती समजली जाणारी राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीस मानाचा वसंतदादा पाटील स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादीत, पुणे या संघाच्या वतीने दरवर्षी ह्या पुरस्काराचे वितरण करण्यात येते. कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरीस नाशिक विभागात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल संघाकडून हा मानाचा पुरस्कार देण्यात आला. यापूर्वी सन 2018 मध्येही राहुरी बाजार समितीस या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
पुरस्कार स्वीकारत असताना राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती, सर्व संचालक मंडळ आणि सचिव आदी अधिकारी वर्ग उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल सभापती, उपसभापती, सर्व संचालक मंडळ आणि बाजार समितीच्या अधिकारी वर्गावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
अहिल्यानगरमधील डिजिटल बाजार समिती :
राहुरी बाजार समितीच्या सभापती, उपसभापती व संचालक मंडळाची उत्कृष्ट कामगिरी, पारदर्शक कारभार, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळवून देणे, त्यांच्या मालाची खरेदी विक्री सुलभ करणे, अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे, बंतोष प्रणालीद्वारे डिजिटल व्यवहार, शेतकऱ्यांना रोख पेमेंट आदी सोयींमुळे व शेतकरी वर्गाला दिलेल्या सुविधा तसेच शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देणाऱ्या योजनांचा सखोल आढावा घेऊन बाजार समितीने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेवून राहुरी बाजार समितीस हा मानाचा पुरस्कार देण्यात आला आहे.