टोमॅटोची आवक वाढली ; लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीकडून शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना
- By - Team Bantosh
- Aug 06,2025
Bantosh : बंतोष न्यूज : दि. 6 ऑगस्ट 2025 : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात टोमॅटो विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग येत असल्याने, विक्री प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक ठेवण्यासाठी बाजार समितीने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.
बाजार समितीने स्पष्ट केले आहे की, शेतकऱ्यांनी आपला टोमॅटो शेतीमाल योग्य प्रकारे वर्गवारी करून (जसे की – लाल, कच्चा, गोल्टी) वेगवेगळ्या क्रेट्समध्ये पॅक करून विक्रीसाठी आणावा. टोमॅटोचे वजन क्रेटसह 22 किलो गृहीत धरले जाणार आहे. त्यामुळे वजन करताना आणि व्यवहार करताना याची नोंद घेणे महत्त्वाचे आहे.
टोमॅटोचे वजन इलेक्ट्रॉनिक काट्यावर घेतले जाणार असून, त्यानंतर संबंधित खरेदीदाराकडून अधिकृत सौदापट्टी घेणे बंधनकारक आहे. या सौदापट्टीवर नमूद असलेले वजन व भाव तपासून घेणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारची खाडाखोड या सौदापट्टीवर करू नये.
लाल रंगाची सौदापट्टी बाजार समितीत जमा करावी लागेल आणि हिरव्या सौदापट्टीवर बाजार समितीचा अधिकृत शिक्का घेणे अनिवार्य राहील. शिक्का घेतल्यानंतरच संबंधित अडत्याकडे सौदापट्टी जमा करून त्यानुसार हिशोबपावती घ्यावी.
टोमॅटो विक्रीनंतर होणारी चुकवतीची रक्कम शेतकऱ्यांनी त्याच दिवशी रोख स्वरूपात ताब्यात घ्यावी. चुकवतीसाठी सकाळी 10 ते 12 आणि दुपारी 2 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंतची वेळ निश्चित करण्यात आली आहे. जर त्या दिवशी रक्कम मिळाली नाही, तर शेतकऱ्यांनी तात्काळ बाजार समितीशी संपर्क साधावा. दुसऱ्या दिवशी कोणतीही तक्रार मान्य केली जाणार नाही, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांनी सौदा करताना कोणतीही शंका निर्माण झाल्यास बाजार समितीकडे लेखी तक्रार करावी. सर्व सूचना शेतकरी बांधवांच्या हितासाठी असून, त्यांचे काटेकोर पालन करणे अत्यावश्यक आहे, असेही बाजार समिती प्रशासनाने सांगितले.