पुणे बाजार समिती : युजर चार्जेस प्रस्तावाला व्यापाऱ्यांचा विरोध
- By - Team Bantosh
- Aug 09,2025
Bantosh : बंतोष न्यूज : दि. 9 ऑगस्ट 2025 : कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे च्या भुसार विभागात ज्या वस्तूंवर बाजार फी (सेस) घेतली जात नाही, अशा सर्व प्रकारच्या वस्तूंवर एक टक्का ‘यूजर चार्जेस" (वापर आकार) आकारण्यासाठी बाजार समितीने राज्याच्या पणन संचालकांकडे फेरप्रस्ताव दाखल केला आहे. यामुळे वर्षाकाठी १७ ते १८ कोटींनी उत्पन्न वाढणार असल्याचे समितीने दिलेल्या प्रस्तावात म्हटले आहे. तर दुसरीकडे या निर्णयाला भुसार बाजारातील व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे.
मार्केट यार्डातील भुसार विभागात विविध प्रकारच्या सुमारे पाच हजारांपेक्षा जास्त वस्तू येतात. यामध्ये फक्त ६०-६५ वस्तूंवरच ‘बाजार फी' (सेस) आकारली जात आहे. यामुळे बाजार समितीच्या उत्पादनात वाढ होत नव्हती. परंतु राज्य सरकारने कृषी माल नसलेल्या मालावर ‘यूजर चार्जेस' (वापर आकार) घेण्यासाठी कायद्यात बदल करून परवानगी दिली आहे. त्यामुळे आता सेस नसलेल्या मालांवर ‘यूजर चार्जेस' लावून उत्पन्न वाढविले जाऊ शकते. याच आधारे कृषी उत्पन्न बाजार समितीने ‘यूजर चार्जेस" (वापर आकार) लावण्यासाठी प्रस्ताव दिला आहे.
प्रस्तावात दिलेले महत्त्वाचे मुद्दे :
१. अकृषिक मालाचा व्यवसाय असणाऱ्या भूखंडाचे उत्पन्न कमी भविष्यात बाजार समितीला मोठ्या निधीची आवश्यकता
२. प्रतिवर्षी सुमारे १७ ते १८ कोटींचे जास्तीचे उत्पन्न प्राप्त होणार
३. भुसार विभागात सुमारे ४० वर्षांपूर्वी भूखंडांचे वाटप
४. रस्ते, गटार, पावसाळी पाणी लाइन देखभाल व दुरुस्ती वेळोवेळी करावी लागते