new-img

Onion Market : कांदा दरात मोठी घसरण ! शेतकरी संकटात

कांदा दरात मोठी घसरण ! शेतकरी संकटात

Bantosh App : बंतोष न्यूज : दि. 24 सप्टेंबर 2025 : अवकाळी पाऊस आणि खराब हवामानाने यंदा शेतकरी संकटात सापडला आहे. साठवलेला कांदा जास्त दिवस टिकेल की नाही, याबाबतही शंका निर्माण झाली आहे. पडलेले बाजारभाव आणि कांदा खराब होण्याचे वाढलेले प्रमाण, या दुहेरी संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

सप्टेंबर महिना अखेर आला तरीही कांद्याच्या भावात वाढ होण्याची चिन्हे दिसत नाहीत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा कांद्याचे दर तब्बल 70 टक्क्यांनी घसरल्याचे दिसून येत आहे. सध्या मिळत असलेल्या भावात कांदा उत्पादन खर्चसुद्धा निघत नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे.

मागील आठवडाभरात कांद्याचे भाव 1000 ते 1500 रुपये प्रति क्विंटल एवढेच राहिले आहेत. मात्र मागील वर्षी याच काळात कांद्याचा भाव तब्बल 3500 ते 4500 रुपये प्रति क्विंटल होता. या तुलनेत यंदा जवळपास 70 टक्क्यांपर्यंत भाव कोसळले आहेत.

सध्या बाजारात कांद्याला फक्त 10 ते 13 रुपये किलो दर मिळतो आहे. इतक्या भावात खर्च तर दूरच, मजुरीदेखील निघत नाही. वातावरणातील बदलामुळे मिळेल त्या दरात कांदा विकण्याची वेळ आल्याची खंत शेतकरी व्यक्त करीत आहेत. अशा परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहावे, अशी आशा आहे.