महाराष्ट्राच्या कृषी-अन्नप्रक्रिया क्षेत्राला जागतिक संधी
- By - Team Bantosh
- Sep 28,2025
महाराष्ट्राच्या कृषी-अन्नप्रक्रिया क्षेत्राला जागतिक संधी
वर्ल्ड फूड इंडिया २०२५ प्रदर्शनात महाराष्ट्र दालनाचे मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते उद्घाटन
Bantosh App : बंतोष न्यूज : दि. 26 सप्टेंबर 2025 : भारत मंडपम, नवी दिल्ली येथे 25 ते 28 सप्टेंबर 2025 दरम्यान आयोजित वर्ल्ड फूड इंडिया 2025 हे प्रदर्शन भारताच्या कृषी आणि अन्नप्रक्रिया उद्योगाला जागतिक स्तरावर नेण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरले आहे. या आंतरराष्ट्रीय मेळाव्यात जगभरातील उत्पादक, खरेदीदार, गुंतवणूकदार आणि तज्ज्ञांनी सहभाग घेतला असून, महाराष्ट्राने या संधीचा प्रभावीपणे लाभ उठवला आहे. पणनमंत्री जयकुमार रावल यांनी महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन करत राज्यातील कृषी आणि अन्नप्रक्रिया क्षेत्राला जागतिक बाजारपेठेत स्थान मिळवून देण्याचा दृढनिश्चय व्यक्त केला.
मंत्री जयकुमार रावल यांनी उद्घाटनानंतर सांगितले की, वर्ल्ड फूड इंडिया 2025 मध्ये सहभाग घेण्याचा मुख्य उद्देश महाराष्ट्रातील अन्नप्रक्रिया उद्योगांना चालना देणे, नव्या गुंतवणुकीला आकर्षित करणे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे हा आहे. महाराष्ट्र हे द्राक्षे, संत्री, आंबा, केळी, डाळिंब, पेरू यांसारख्या फळांचे आणि हळद, मिरची, लसूण यांसारख्या मसाल्यांचे प्रमुख उत्पादक राज्य आहे. या उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत अधिक मोठ्या प्रमाणात पोहोचवण्यासाठी पॅकिंग, प्रक्रिया, लॉजिस्टिक आणि ब्रँडिंग यामध्ये सुधारणा आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रदर्शनाचे व्यासपीठ या सुधारणांसाठी एक उत्तम संधी ठरेल, असेही मंत्री रावल यांनी अधोरेखित केले.
महाराष्ट्र पॅव्हेलियनमध्ये राज्याच्या कृषी संपत्तीचे प्रभावी प्रदर्शन करण्यात आले. द्राक्षे, संत्री, आंबा, केळी, डाळिंब, हळद, मिरची आणि लसूण यांसारख्या उत्पादनांनी परदेशी खरेदीदारांचे लक्ष वेधले. या उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी असली तरी योग्य ब्रँडिंग, पॅकिंग आणि वितरण व्यवस्थेच्या अभावामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या परिश्रमाचे पूर्ण मूल्य मिळत नाही. या व्यासपीठामुळे या उणिवा दूर होऊन शेतकऱ्यांना योग्य दर मिळतील, असे मंत्री रावल यांनी सांगितले.