new-img

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदतीचे वितरण करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदतीचे वितरण करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सर्व निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना सरसकट मदत

Bantosh App : बंतोष न्यूज : दि. 25 सप्टेंबर 2025 : राज्यात अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने नद्यांना पूर आला आहे. पिकांचे नुकसान झाले असून जमीन खरडून गेली आहे. या संकटकाळात राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून सर्व निकष बाजूला ठेवून सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत केली जाईल. तसेच दिवाळीपूर्वीच ही मदत शेतकऱ्यांना वितरित करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी औसा तालुक्यातील उजनी आणि निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथे अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीची माहिती घेतली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्वप्रथम औसा ते तुळजापूर महामार्गावरील पुलावरून तेरणा नदीपात्राची, नदीला आलेल्या पुरामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर उजनी गावालगत असलेल्या तेरणा नदीपात्राची व पुरामुळे गावातील घरे, दुकानांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करून शेतकरी, ग्रामस्थांकडून शेतपिकांच्या नुकसानीची माहिती घेतली.

टंचाईच्या काळात लागू असलेल्या उपाययोजना अतिवृष्टीतही लागू करण्यात येतील. शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. अतिवृष्टीमुळे पुराचे पाणी घरात, दुकानात शिरल्याने झालेल्या नुकसानीचीही मदत देण्यात येईल. मंगळवारीच राज्य शासनाने नुकसानग्रस्तांसाठी मदतीचा २ हजार २०० कोटींचा पहिला हप्ता मंजूर केला. ज्याप्रमाणे नुकसानीचे अहवाल प्राप्त होतील, त्यानुसार अधिकची मदत केली जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

उजनी गावालगत तेरणा नदीवर औसा व तुळजापूर तालुक्याला जोडणाऱ्या पुलाची उभारणी, तसेच उजनी गाव ते राष्ट्रीय महामार्गावरील उजनी मोडला जोडणाऱ्या रस्त्याच्या कामाला मंजुरी देण्याची घोषणाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केली.

पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नदीकाठच्या जमिनी खरडून गेल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिकची मदत मिळावी, अशी मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी यावेळी केली. आमदार संजय बनसोडे यांनीही उदगीर, जळकोट तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीच्या मदतीबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले.

महाराष्ट्र, कर्नाटक सीमेवर तेरणा आणि मांजरा नदीच्या संगमावर असलेल्या औराद शहाजानी येथील नुकसानग्रस्त भागाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकरी बांधवांशी संवाद साधला.

औराद येथे मांजरा व तेरणा नद्याच्या संगमामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पिकाच्या  नुकसानीसह जमीन खरडून गेली आहे. मांजरा, तेरणा नदीच्या संगमामुळे नदी पात्र वाढते, म्हणून आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी काही बॅरेजेसबाबत सुचवले आहे, त्यानुसारही कार्यवाही करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

नुकसान झालेल्या भागातील पंचनाम्याची कार्यवाही सुरू आहे. ज्या भागात पाणी शिरले अशी नोंद आहे, पण तिथे पोहचणे शक्य नाही, अशा  ठिकाणी ड्रोनद्वारे करण्यात आलेला पंचनामाही ग्राह्य धरण्यात येईल. तसेच मोबाईलवरील फोटोही स्वीकारण्यात येतील, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.